पैसाच सर्वस्व, सर्वोच्च असतो!

गेल्या अलीकडच्या काही वर्षांमध्ये सर्वांचं पैशाच्या मागे धावत सुटलेत. पैसा, पैसा आणि पैसा कमवण्यासाठी सर्व काही सुरू आहे. पैसा नसेल तर काहीच नसतं, पैशाशिवाय कुणाचं पान सुद्धा हलत नसतं पैसा नसला तर जगणं सुद्धा कठीण होऊन जात असतं. हे आता प्रत्येकाला कळून चुकलंय. पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही, हे प्रत्येकाच्या ध्यानीमनी आलंय. त्यामुळे आता पैशाशिवाय तरणोपाय नाही. याच भावनेने सर्वच जण पैशाच्या मागे धावताहेत. खरंच पैसा म्हणजे सर्वस्व सर्वोच्च आहे? हे धावणाऱ्याच्या कृतीतून दिसून येतं. 

पैसा हे जरी विनिमयाचे साधन असलं तरी दैनंदिन जीवनात कुठलंही काम करण्यासाठी पैसाच लागतोय. पूर्वी विनिमयाचं साधन हे भिन्न स्वरूपाचं होतं मात्र वर्तमान स्थितीत पैसा हेच विनिमयाचं साधन मानलं जातं. आणि यातूनच सर्वकाही घडत.. घडविल जात.. पैशातून काहीही घडत. हे सर्वांना माहिती असतं आणि काहीही घडवण्यासाठी खिशात पैशाचं असणं महत्त्वाचं असतं. खिशात पैसा असला की खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर सहजतेनं शोधता येऊ शकतील. समस्या, संकट यावर मात देण्याचं साधन पैसा असतं. जीवनाचं कोडं सोडायचं असलं ती खिशात पैशाचा खणखणाट असावा लागतो.

आयुष्यात काय मिळवायचं ? याच उत्तर अनेकांनी शोधलेलं नसतं. कदाचित अनेक व्यक्तीना ते सापडत नसावं. तर अनेकांनी ते शोधण्याचं धाडसही केलेलं नसावं. जीवनात सर्वकाही मिळवायचं तर पैशाचं असणं महत्त्वाचं असतं. हे ज्यांच्या मनात पूर्णपणे बिंबलेलं असतं, त्यांचं आयुष्य हे पैशाच्या मागे धावत सुटलेल असतं. त्यांचं सर्वस्व, सर्वोच्च, सर्वकाही हे पैसाच असतं. पैशापुढे त्यांचं नातं, कुटुंब, मित्र, आप्तेष्ट सर्वकाही बाजूला सारलेलं असतं. अगदी मृत्यूच्या दारात सुद्धा त्यांना पैसा कमावणं महत्त्वाचं वाटतं. मृतदेहाच्या टाळूवरच लोणी खाणं त्यांनी सोडलेलं नसतं. अशी नतद्रष्ट असलेली माणसं समाजात आजघडीला पावलोपावली मिळतात.

 आयुष्यात पैसाच मिळवायचा ? अशा अनेकांनी स्वतःचा आयुष्य पैशापुढे झोकून दिलेलं असतं. पैसा हेच एकमेव माध्यम वाटतं, सर्व सुख, सुविधा, साधन मिळवण्याचं !  अगदी स्वतःचं आयुष्यही नतमस्तक केलेलं असतं, पैशाच्या कोऱ्या करकरीत कागदासाठी ! खरंच हे माणूस म्हणून कितपत योग्य वाटतं ? पैसा मिळवायचाय.. तो कमवायचाय.. यासाठी स्वतःचं सर्वस्व झोकून दिलेलं असतं. पैशापुढे तर अनेकांचं नैतिकपण, चरित्र व चारित्र्य, प्रामाणिकपणा, सत्यता, आपलेपण, मनसुध्दा गहाण टाकलेलं असतं. खरंच इतकं पैशाचं मूल्य असतं?

आयुष्यात पैशाचं मूल्य ओळखणं अतिशय आवश्यक असतं. ज्यांनी पैशाचं मूल्य ओळखलं, त्यांना आयुष्यात कुठलचं काही कमी पडतं नसतं. पैसा म्हणजेच सर्वकाही नसतं.पण पैसा हेच सर्वस्व व सर्वोच्च असतं. पैशानं सर्व काही साध्य होत नसतं.. पण सर्वकाही साध्य करायचं असलं की, पैशाचं असणंच महत्त्वाचं असतं. स्वतःचं जीवन सुख समाधानानं जगता यावं, इतका पैसा प्रत्येकाकडे असावा. त्याचं रूप व स्वरूप मर्यादित असणे गरजेच असतं. पैशाचं अमर्यादपण माणसाला अधोगतीकडे नेत आणि अधोगती ही विनाशाकडे मार्गक्रमण करीत असते, हे वास्तव स्वीकारावं लागणार आहे. 

आज घडीला जिकडं पहावं तिकडे सर्वत्र पैशांचा बोलबाला दिसून येतो. अगदी सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा पैशाच्या लालसेपोटी अनेक अनैतिक गोष्टीला सुद्धा प्राधान्य देऊ लागतो. अगदी संकट काळात सुद्धा पैशाचं ओरबडणं सुरू असतं. माणसाने या विकृतीकडे का वळावं? हेच कळत नाही. असंख्य डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, इंजिनियर, बिल्डर, सीए उद्योगपती, नेते-अभिनेते ही मंडळी पैशाच्या लालस व हव्यासापोटी कित्येकांचा जीव घोटताहेत. अपवादात्मक कित्येकांकडे अमाप पैसा असतानाही अगदी सर्वसामान्यांच जीवन जगणं असतं. केवळ व्यक्ती संपविण म्हणजेच हत्या नव्हे तर व्यक्तीचं मन मारणं ही सुद्धा एक प्रकारची हत्याच असते.

काळाच्या ओघात पैसा आणि पैसा सर्वस्व व सर्वोच्च राहील. त्यापुढे सर्व नातीगोती आप्तेष्ट, कुटुंब, सर्व काही फिक पडणार आहे. त्याची नांदी वर्तमान स्थितीत दिसून येत आहे. आपुलकी व आपलेपणापेक्षा पैशाला प्राधान्य देणारी माणसं पावलोपावली जाणवताहेत. कोण आपलं ? कोण परक? यापेक्षा कुणाकडे पैसा जास्त आणि कुणाकडे कमी नातेवाईक व नातेसंबंध ठरायला लागतात. सर्वाधिक पैसा, संपत्ती, गाड्या, महागडी साधन असलेल्यांनाच आपलंसं केलं जातं. तर सर्वसामान्य पद्धतीचं जीवन व दैनंदिन जीवनात सोपेपणान आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना धिडकारलं जातंय. हीच आजच्या आधुनिक जीवनाची पद्धत बनली आहे. आज मनानं मोठी असलेली माणसं नकोत, तर केवळ पैशाने मोठी असलेली माणसं हवीत, हा एक अलिखित नियमच बनवून टाकला आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने अनेकांना जवळ केलं जातं तर अनेकांना बाजूला सारलं जातं. 'ना बीबी.. ना बडा भैया.. सबसे बडा रुपय्या'  हीच जीवन व समाज पद्धती सर्वत्र रूढ झालीय.

एकीकडे सढळ हाताने दान दिलं जातं. या हाताचं त्या हाताला सुद्धा माहिती नसतं, इतकं गुप्त पद्धतीने अनेकांकडून दातृत्व दाखविल जातं. असं व्यक्तिमत्व अगदी संकटाच्या काळात सुद्धा स्वतः अडचणीत असताना धावून जात असतं. तर दुसरीकडं दोन्ही हातांन पैशाचं ओढणं सुरू असतं. कितीही कमविल तरी त्यांच्यासाठी कमीच असतं. दुसऱ्यांची मुंडी मुरगाळून त्यांचे पैशाचे थर उभे राहतात. तर एखाद्या सर्वसामान्य माणसानं आयुष्यभर कमविलेल्या पैसा व इभ्रतील पायदळी तुडवून स्वतःचे इमले एकमेकांवर चढवीत असतात. यांच्या संपत्ती, इमारत व बंगल्याखाली कित्येक सर्वसामान्यांचे जीव गाडलेले असतात. हे प्रचंड जळजळीत वास्तव आहे. ही समाजासाठी लागलेली प्रचंड मोठी किड आहे. आणि आपली माणसं सुद्धा ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचाच उदोउदो करण्यात धन्यता मानतात. त्यांच्याशिवाय यांचे पानसुद्धा हालत नसतं. ही सुद्धा आपल्या समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे.

पैसा हेच सर्वस्व आणि सर्वोच्च असतं हे आता लपून राहिलेले नाही. त्यासाठी सर्व योजना, नियोजन डोक्यात घट्ट बसलेलं असतं. केवळ पैसा मिळविण्यासाठी स्वतःच संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं जातं. आणि खर्ची झालेलं आयुष्य हे पैशासाठीच घालविलेल असतं. पैशानं सुख-समाधान व भौतिक साधने, आरोग्य, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी विकत घेता येऊ शकतात. केवळ चल अचल संपत्तीचा नव्हे तर अगदी माणसांना सुद्धा विकत घेता येऊ शकतं, हे पैशाने दाखवून दिलंय. म्हणून पैशालाच सर्वस्व आणि सर्वोच्च समजलं जातं. अखेर 'ये पैसा बोलता है...' हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट व सत्य आहे.

शिवाजी भोसले 9689964143
आत्मभान जगण्याचं !

Comments