एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
अचानक काही आठवलं म्हणून त्यानी एक कागद पेन घेऊन लिहायला सुरुवात केली ....
या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं .
याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली आणि सेवानिवृत्त झालो.
याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं
याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेला मुकला, त्याच्या कार अपघातामुळे !
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले. शिवाय गाडीचे नुकसान झालं ते वेगळंच ..!
आणि शेवटी त्यांनी लिहिलं..….
"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरलं हे वर्ष माझ्यासाठी !!!
इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतीकडे पहाताच त्याना काहीतरी वेगळं असल्याचा अंदाज आला.
सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या.
थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. तो कागद त्यानी त्यांच्या पतीच्या कागदा शेजारी ठेवला.
लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली.
त्यात लिहिलं होतं...
गेले कित्येक वर्षे मला त्रास देणारं पित्ताशय या वर्षात मी काढून टाकलं. आता मला कसलाच त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!
याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडली आणि एका चांगल्या नोकरीतून सन्मानाने निवृत्त झालो. आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे...!!
याच वर्षात माझे तीर्थरूप वडील वयाच्या 95व्या वर्षी कोणताही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न रहाता इहलोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले.!!
याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं,
जीवघेण्या अपघातातून. कार पूर्णपणे मोडीत निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!
आभारी आहे देवा ...!!
किती सुंदर आणि चांगलं वर्ष दिलंस तू मला ..!!
बघा ...
प्रसंग तेच पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!!
नकारात्मक विचार बाजूला सारून एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!
आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात. त्यांची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यांसमोर ठेवायला हवी
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगल्यास जगणं अजून सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
शेवटी चिडचिड करून जगायचं की आनंद घेत, हे प्रत्येकानं ठरवावं.
दु:खात सुख शोधावं, सुखात दु:ख नको !
Comments
Post a Comment